तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी): तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील अत्यंत वर्दळीच्या मानल्या जाणाऱ्या इंद्रायणी कॉलेज रोडवरील फुटपाथची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालता यावे यासाठी उभारण्यात आलेल्या या फुटपाथवर सध्या मोठ्या वाहनांचे अतिक्रमण, वाढलेले गवत, कचऱ्याचे ढीग आणि तुटलेली अवस्था पाहायला मिळत आहे. त्यामुळे “हा फुटपाथ नागरिकांना चालण्यासाठी बनवला आहे की गाड्या पार्क करण्यासाठी?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.
फुटपाथवर वाहनांचा विळखा आणि दुरावस्था
वृंदावन सोसायटी व शिवनेरी हौसिंग सोसायटी परिसरातील या मुख्य रस्त्यालगत असलेल्या फुटपाथवर खाजगी बसेस आणि ट्रॅव्हलर्ससारखी मोठी वाहने बिनधास्तपणे उभी केली जात आहेत. यासोबतच फुटपाथवर मोठ्या प्रमाणात गवत आणि झुडपे वाढली असून अनेक ठिकाणी तो तुटलेल्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी फुटपाथवरच कचरा टाकण्यात आल्याने अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे, तर विद्युत रोहित्राच्या (ट्रान्सफॉर्मर) बाजूलाही गवत आणि कचरा साचल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताची भीती
केवळ फुटपाथच नव्हे, तर इंद्रायणी कॉलेज रोडवरही गेल्या अनेक वर्षांपासून खड्डे पडले आहेत. एकीकडे फुटपाथवर गाड्यांचे पार्किंग व गवत असल्यामुळे पादचाऱ्यांना, विशेषतः शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना नाईलाजाने मुख्य रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यातच रस्त्यावरील खड्डे आणि वाहनांची वर्दळ यामुळे पादचाऱ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरू आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांमध्ये संताप
गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची आणि फुटपाथची हीच अवस्था असूनही तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाकडून यावर कोणतेही ठोस नियोजन केले जात नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. नगरपरिषदेने तातडीने याकडे लक्ष देऊन फुटपाथवरील अतिक्रमण हटवावे, वाढलेले गवत व कचरा स्वच्छ करावा तसेच फुटपाथ आणि रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
अखंड भारत मिशन आरटीआय महासंघ अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया आंतरराष्ट्रीय मानवाधिकारसह अपराध नियंत्रण मंच
अखंड भारत जन आवाज मीडिया 98 22 70 97 80








